कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ब्रिटनने 19 जुलैपर्यंत वाढवले निर्बंध


ब्रिटन : कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव भारतात कमी होताना दिसत आहे. पण, जगभरातील काही देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निर्बंध एवढ्यात हटवले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच हे निर्बंध साधारण एक महिन्यासाठी वाढवले असून 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन संदर्भातील सर्व निर्बंध लागू असणार आहेत. यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध 21 जून रोजी संपणार होते.

बोरिस जॉन्सन यांनी बोलताना सांगितले की, कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनमुळे प्रादुर्भावाचा दर आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे चिंता वाढली आहे. बोरिस यांनी केलेल्या या घोषणेसोबत आता ‘फ्रीडम डे’ 19 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.

पुढे बोलताना जॉन्सन यांनी सांगितले की, निर्बंध हटवण्यासाठी आणखी थोडी वाट पाहणे उत्तम ठरेल. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, 19 जुलै हा निर्बंधांचा अखेरचा दिवस असेल. तसेच आता देशात 40 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम आणखी जलद करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.