राज्य सरकारने दिली लर्निंग लायसन्ससाठी घेतली जाणारी परीक्षा घरूनच देण्याची परवानगी


मुंबई – कोरोनामुळे अनेक कार्यालये बंद आणि निर्बंध असल्यामुळे प्रवास करण्यावर मर्यादा येत असल्यामुळे याचदरम्यान अनेकांना लर्निंग लायसन्स काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्र सरकारने नागरिकांच्या या समस्येवर पर्याय शोधत मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने लर्निंग लायसन्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा घरातून देण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील ५० आरटीओ कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी लर्निंग लायसन्ससाठीच्या परीक्षेबद्दलची माहिती दिली. आरटीओकडून लर्निंग लायसन्स मिळवण्यासाठी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लर्निंग लायसन्स दिले जाते. ही परीक्षा आरटीओ कार्यालयातच घेतली जात होती. त्यामुळे नागरिकांकडे कार्यालयात जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे या परीक्षेबद्दल राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

आता राज्यात लर्निंग लायसन्ससाठी द्यावी लागणारी परीक्षा घरातूनच देता येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. मंगळवारी तसे आदेश परिवहन विभागाने राज्यातील ५० आरटीओ कार्यालयाना दिले आहेत. या सुविधेमुळे आर्थिक आणि सामाजिक लाभ होणार आहे. कार्यालयात होणारी गर्दी कमी होणार असून, दलाली संपेल आणि भ्रष्टाचारही कमी होईल.

त्याचबरोबर कर्मचाऱ्यांवरील कामांचा भार कमी होणार असून नागरिकांच्या वेळेत व खर्चात बसत होईल, असे ढाकणे म्हणाले. ही सुविधा पुढील दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरू करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यात परिवहन विभाग वर्षाला २० लाख लर्निंग लायसन्स वितरित करतो. एवढ्याच संख्येने कार आणि दुचाकीची नोंदणी केली जाते. लायसन्स आणि वाहन नोंदणी करण्यासाठी देशभरात एनआयसी आणि सारथी या दोन्ही संकेतस्थळावर आवश्यक ते बदल करण्यात आलेले असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो. त्यात आपली सविस्तर माहिती भरावी लागते. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आरटीओकडून वेळ उपलब्ध करून दिली जाते. परीक्षेची तारीख कधी लवकर मिळते, तर कधी महिनाभर वाट बघावी लागते. पण, नव्या सुविधेमुळे यात बदल होणार आहे. घरबसल्या परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होणार आहेत. ही परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. परीक्षा देण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध सारथी सेवेत प्रवेश करताच परवाना पर्याय उपलब्ध होईल. त्यात आधार क्रमांक नमूद केल्यानंतर त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती येईल आणि तो अर्ज करू शकणार आहे.