भविष्यात येणाऱ्या कोरोना लाटांचा लहान मुलांवर गंभीर परिणाम होणार नाही; AIIMS च्या प्रमुखांची माहिती


नवी दिल्ली – लहान मुले कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वात जास्त प्रभावित होतील, असे सांगितले जात आहे. दरम्यान कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुलं संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. त्यांनी कोरोना लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचे कोरोना स्थितीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

असा कोणताही डेटा देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध नाही ज्यामध्ये कोरोना लाटेत लहान मुले गंभीर संक्रमित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती रणदीप गुलेरिया यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात संक्रमित होऊन रुग्णालयात दाखल झालेल्यांपैकी ६० ते ७० टक्के मुलांना इतर आजार किंवा कमी प्रतिकारशक्ती होती. गंभीर लक्षणे नसलेली निरोगी मुले रुग्णालयात दाखल न होताही बरी झाली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

लोकसंख्या जास्त असली की एकाहून जास्त लाटा येत असतात. जेव्हा लोकसंख्येचा एक मोठा भाग संसर्गाविरूद्ध रोग प्रतिकारशक्ती प्राप्त करतो, तेव्हा संसर्गावर नियंत्रण येते आणि संसर्ग हंगामी होतो. स्वाईन फ्ल्यूप्रमाणे जो सामान्यत: पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये पसरतो. कोरोनाच्या विषाणूंमध्ये बदल होत असल्यामुळे लाटा येत असतात. नवीन उत्परिवर्तन जास्त संसर्गजन्य झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता जास्त असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

त्यांनी यावेळी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे, असे सांगितले. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली की लोकांमध्ये भीती निर्माण होते आणि त्यांच्या वागणुकीतही बदल होतो. कोरोनाच्या नियमांचे ते काटेकोरपणे पालन करतात आणि कोणत्याही औषधांविना साखळी तोडण्यास मदत मिळते. पण जेव्हा अनलॉक होते, तेव्हा लोकांना आता प्रादुर्भाव होणार नसल्याचे वाटते आणि नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पुन्हा एकदा संसर्गाचा फैलाव होतो आणि याचे रुपांतर लाटेत होते, असे त्यांनी सांगितले आहे.

जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यास किंवा लोकांमध्ये कोरोना प्रादुर्भावाविरोधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यास या लाटा रोखल्या जाऊ शकतात. पण सध्या कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करणे महत्वाचा मार्ग असल्याचे ते म्हणाले आहेत.