पहिल्याच पावसामुळे मुंबईची झाली तुंबापुरी; मध्य आणि हार्बर लोकल सेवा ठप्प


मुंबई – मुंबईत मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले असून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मागील काही तासांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. मुंबईकरांची मॉन्सूनच्या पहिल्याच पावसामुळे त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईची सालबादप्रमाणे यंदाही तुंबापुरी झाली आहे. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणेही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेही ठप्प झाली आहे. पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.

केरळातून पुढे सरकलेला मॉन्सून वेगाने आधी महाराष्ट्रात तर आज एक दिवस आधी मुंबईत दाखल झाला. यापार्श्वभूमीवर हवामान विभागाने बुधवारपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला होता. पावसाने हवामान खात्याच्या त्याच अंदाजावर शिक्कामोर्तब केले आहे. मंगळवारी रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरांत जोरदार पावसाला सुरूवात झाली. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार पाऊस कोसळत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पहिल्या पावसाचा फटका बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मध्य रेल्वेने ट्विट करुन दिली आहे.

कुर्ला आणि सीएसएमटी या रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे रुळांवर संततधार पाऊस पडत असल्यामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १० वाजेच्या सुमारास अप मार्गावरील रेल्वेसेवा थांबवण्यात आली. ट्रॅकवरील पाणी ओसरल्यानंतर ही रेल्वे सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.