VIRAL: कोविड सेंटरमध्ये सैराटमधील ‘झिंगाट’ गाण्यावर जेव्हा रोहित पवार थिरकतात


सध्या अनेक लोकप्रतिनिधी कोरोना संकटात बाधितांच्या मदतीसाठी मैदानात उतरलेले असून प्रत्येकजण आपापल्या परीने शक्य ती मदत करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचाही यामध्ये समावेश आहे. रोहित पवार कोरोना संकटाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीने अनेकांच्या भेटीगाठी घेत असतात. दरम्यान कर्जत येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना भेटण्यासाठी सोमवारी रोहित पवार गेले असता, त्यांनी चक्क सैराटमधील झिंगाट गाण्यावर ठेका धरत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला सोमवारी रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला.


रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘झिंगाट’ गाण्यावर तेथील आजींनीही ठेका धरला आणि आणि रोहित पवारही त्यात सहभागी झाले. हा व्हिडीओ रोहित पवार यांनीही ट्विट केला असून म्हटले आहे की, गायकरवाडी (कर्जत) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांमध्ये असलेलं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यासाठी गायक तुषार घोडके यांचा गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी त्यांच्या ‘झिंगाट’ गाण्यावर तिथल्या आजींनीही ठेका धरला आणि आणि नकळत मीही त्यांच्यात सहभागी झालो. सध्या सोशल मीडियावर रोहित पवारांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.