मुकेश अंबानी यांची खुर्ची गौतम अदानींमुळे संकटात  

केवळ भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची खुर्ची संकटात आली असून अदानी ग्रुपचे गौतम अदानी लवकरच आशियाचे नवे धनकुबेर बनू शकतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. ब्लूमबर्ग बिलीनेअर इंडेक्सच्या रिपोर्ट नुसार सोमवारी रिलायंस इंडस्ट्रीचे शेअर घसरल्याने मुकेश यांची संपत्ती ५५.४ कोटी डॉलर्सने कमी झाली आहे आणि आता ७६.५ अब्जावर आली आहे.

दुसरीकडे अदानींच्या दोन कंपन्याच्या शेअर मध्ये आलेल्या तेजीमुळे अदानी यांची संपत्ती १.२८ अब्ज डॉलर्सने वाढून ७०.२ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत ६.३ अब्जाचा फरक राहिला आहे. विशेष म्हणजे अदानी यांच्या सहा लिस्टेड कंपन्यांपैकी फक्त दोन कंपन्यांच्या शेअर मध्ये तेजी आलीली असून बाकी चारी कंपन्याच्या शेअर मध्ये किरकोळ घसरण झाली आहे.

अदानी ग्रीन एनर्जी शेअर ४.७५ टक्क्याने वधारला आहे तर अदानी ट्रांसमिशन शेअर ५ टक्क्यांनी वाढला आहे. अदानी यांच्या पाच कंपन्यांची मार्केट कॅप १ लाख कोटी हून अधिक झाली आहे. जागतिक धनकुबेर यादीत मुकेश अंबानी १३ व्या तर गौतम अदानी १४ व्या स्थानावर आहेत. या वर्षी शेअर मध्ये वाढ झाल्याने अदानी यांच्या संपत्तीत वर्षात ३६.५ अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. टाटा ग्रुप, रिलायंस नंतर अदानी १०० अब्ज डॉलर्स मार्केट कॅप असलेले तिसरे व्यावसायिक घराणे बनले आहे.

जागतिक धनकुबेर यादीत पहिल्या दहा श्रीमंतात ९ अमेरिकन आहेत. पहिल्या नंबरवर अमेझॉनचे जेफ बेजोस तर दुसऱ्या नंबरवर टेस्लाचे एलोन मस्क आहेत.