मनसेच्या दणक्यानंतर अखेर आदित्य नारायणने मागितली अलिबागकरांची माफी


सोनी टीव्हीवरील ‘इंडियन आयडल-१२’ हा शो गेल्या अनेक दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. अमित कुमार यांनी किशोर कुमार स्पेशल एपिसोडमध्ये नाराजी व्यक्त केल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर या शोवर पहिला इंडियन आयडल अभिजीत सावंतनेही नाराजी व्यक्त केली. कधी शोमधील स्पर्धकांचा खोटे प्रेमाचे नाटक तर कधी जजेस आणि निर्मात्यांच्या वागणुकीमुळे या शोवर टीका केली गेली.

नुकताच पुन्हा हा शो सूत्रसंचालक आदित्य नारायणमुळे चर्चेत आला होता. शोच्या सुत्रसंचालनावेळी आदित्यने अलिबागबद्दल केलेल्या वक्तव्याने त्यावर जोरदार टीका केली गेली. त्यानंतर आता आदित्य नारायणने सोशल मीडियावरून माफी मागितली आहे. यासंदर्भात आदित्य नाराय़णने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

यात तो म्हणाला, मला हात जोडून नम्रपणे अलिबागमधील लोकांची आणि माझ्या इंडियन आयडलमधील वक्तव्यामुळे दुखावलेल्या सर्वांची माफी मागायची आहे. माझा कुणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नव्हता. अलिबागबद्दल मला प्रचंड प्रेम आणि आदर आहे. माझ्या स्वत:च्या त्या जागेशी, लोकांशी आणि मातीशी भावना जोडल्या गेल्या असल्याचे म्हणत आदित्यने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे.

‘इंडियन आयडल १२’ या शो दरम्यान एका स्पर्धकाला गाणे संपल्यानंतर आदित्यने अलिबागवरुन टोला लगावला होता. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त केला होता. अमेय खोपकर यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला, असून यापुढे अलिबागबद्दल असे काहीही वक्तव्य करशील, तर तुझ्या कानाखाली आवाज काढेन, असा इशारा दिला होता.