राज्य सरकारने कोरोनाची मोफत लस देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घ्यावी – खासदार राहुल शेवाळे


मुंबई : महाराष्ट्रातील 18 वर्षांवरील सर्वांसाठीच्या लसीकरण मोहिमेला येत्या 1 मे पासून सुरुवात केली जाणार आहे. तसेच राज्य सरकारने राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक मदत घ्यावी, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्घव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निधी देखील मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेत राज्य सरकारमार्फत 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोरोना लस देण्यात यावी. यासाठी साधारण साडे पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 79 हजार कोटींच्या ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत. मोफत लसीकरणासाठी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेच्या या निधीचा वापर करावा. तसेच राज्य सरकारने महानगरपालिकेचा हा निधी काही वर्षांनी परत द्यावा, असेही खासदार शेवाळे यांनी सुचविले आहे.