योग्य उपचार आणि काळजी घ्या, प्रीतम मुंडेंना धनंजय मुंडेंचा काळजीयुक्त संदेश!


मुंबई – राज्यातील जनतेला बीडमध्ये धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधील वाद काही नवा नाही. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील या दोन कुटुंबांमधील आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. पण, त्यापलिकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेले नाते देखील काही वेळी समोर आलेले आहे.

भाजप खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी शनिवारी संध्याकाळी प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर प्रीतम मुंडे यांच्यासाठी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. धनंजय मुंडेंनी हे ट्वीट आपल्या ट्विटर अकाऊंटवर केले आहे.


प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिला आहे. काही लक्षणे आढळल्यामुळे बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे या उपचार घेत असल्याचे समजले. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने आपण लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो, असं आपल्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, भावाच्या सदिच्छांना प्रतिसाद देत “धन्यवाद!” अशी प्रतिक्रिया प्रीतम मुंडे यांनी दिली आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लोकांना आवाहन करणारा व्हिडिओ खासदार प्रीतम मुंडे यांनी पोस्ट केला होता. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा हे लक्षणे जाणवायला लागले. मी २१ तारखेला RTPCR चाचणी केली. पण त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की फक्त RTPCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला कोरोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणे असतील, तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून मी घेत असल्याचे प्रीतम मुंडे या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.