
नवी दिल्ली – एका आठवड्याच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती कायम आहे. कोरोनाबाधितांच्या वाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन दिल्ली सरकारने राज्यातील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
केजरीवाल सरकारने दिल्लीतील लॉकडाऊन वाढवला
कोरोनाच्या तीन लाटांचा यशस्वीपणे सामना करणाऱ्या दिल्ली सरकारची झोप चौथ्या लाटेने उडवली आहे. कधी नव्हे एवढी रुग्णवाढ दिल्लीत दररोज नोंदवली जात असून, या महामारी होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर केजरीवाल सरकारने लॉकडाऊन न लावण्याची भूमिका घेतली होती. पण आता कोरोनाबाधितांच्या संख्येचा विस्फोट झाल्यानंतर रुग्णालयावरील भार वाढू लागला आहे. त्यानंतर सरकारने तातडीने लॉकडाऊन लागू केला होता.
दिल्लीत मागील एका आठवड्यांपासून लॉकडाऊन लागू केलेला आहे. दिल्लीत या काळात देखील रुग्णसंख्येत कोणतीही घट झालेली नाही. उलट ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे दिल्लीतील आरोग्य व्यवस्था हतबल झाली आहेत. अनेक रुग्णालयात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे मृत्यू झाले असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने लॉकडाऊन एका आठवड्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. केजरीवाल यांनी पत्रकार परिषदे घेऊन याची माहिती दिली.
