वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक निलंबित


मुंबई – मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम एस रेड्डी यांना वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी अखेर निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती एएनआयने दिली आहे. आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये रेड्डी यांच्या देखील नावाचा उल्लेख असून त्याच आधारावर रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. २५ मार्च रोजी मेळघाटमध्येच दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्तापर्यंत विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये विनोद शिवकुमार याने छळ केल्याचा उल्लेख केला होता.

डॅशिंग अधिकारी म्हणून मूळच्या सातारच्या असणाऱ्या दीपाली चव्हाण या परिचित होत्या. दीपाली चव्हाण डिंक तस्करांचा पाठलाग करताना दुचाकीवर थेट मध्य प्रदेशपर्यंत त्यांचा पाठलाग करत गेल्याचा किस्सा देखील अधिकारी आणि कर्मचारी अभिमानाने सांगतात. त्यामुळे लेडी सिंघम म्हणून त्यांची ओळख होती. पण अचानक त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. त्यांनी आत्महत्येपूर्वी ४ पानांची सुसाईड नोट लिहिली होती, त्यामध्ये आपल्या होत असलेल्या छळाचा उल्लेख त्यांनी केला होता.

रेड्डी यांच्या अटकेची मागणी भाजपकडून लावून धरली जात आहे. अपर मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर मंगळवारी भाजपकडून ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रेड्डी यांच्यावर कारवाईसाठी दबाव येत असताना सरकारकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.