महाराष्ट्रात घरोघरी जाऊन कोरोना लस देण्यास मोदी सरकारने नाकारली परवानगी


मुंबई – मुंबई महानगरपालिकेचा वयस्कर, अंध आणि दिव्यांग व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्याचा प्रस्ताव केंद्रातील मोदी सरकारने फेटाळला आहे. केंद्र सरकारचे घरोघरी म्हणजेच डोअर टू डोअर जाऊन लस देण्यासंदर्भात कोणतही धोरण नसल्याचे सांगण्यात आल्याचे मुंबई मिररने आपल्या वृत्तात म्हटले आहे. पण केंद्राने हे उत्तर दिलेले असतानाच दुसरीकडे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाण्यासंदर्भात माहिती दिली होती. दोन किमीपेक्षा अधिक प्रवास लोकांना करावा लागू नये म्हणून ही मोहीम राबवली जाण्यासंदर्भातील भाष्य आरोग्यमंत्र्यांनी केले होते.

यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त सचिव (आरोग्य) सुरेश काकानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास दीड लाख लोके मुंबईमध्ये असे आहेत, जे अंथरुणाला खिळून आहेत किंवा अपंग आहेत. लस घेण्यासाठी हे लोक लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. याच लोकांना घरी जाऊन लस देण्यासंदर्भात केंद्राकडे परवानगी मागितली होती. पण केंद्राचे असे कोणतेही धोरण नसल्याचे केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले. ही परवानगी जर मिळाली असती तर या लोकांना नक्कीच फायदा झाला असता.

मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहून अंधेरी पश्चिमेचे भाजपा खासदार अमीत साटम यांनाही झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले होते. १०० किंवा त्याहून अधिक नागरिकांना फायदा होईल या दृष्टीने महानगरपालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भातील मोहीम राबवावी, अशी मागणी साटम यांनीही केली होती. या अशा मोहिमेला चेन्नईमध्ये चांगले यश मिळाल्याचे त्यांनी म्हटले होते.

केंद्रीय आरोग्य मंत्रलायतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तळागाळातील लोकांपर्यंत लस पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना तयार केली असून या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आहे. लसीकरणासंदर्भात अनेकांना भीती वाटत असली, तरी ते रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेत आहेत. आपल्याला संसर्ग होईल, अशी भीती त्यांच्या मनात आहेत. आम्ही आता लसीकरण तळागाळातील लोकांपर्यंत नेणार असल्यामुळे लोकांना दोन किमीपेक्षा अधिक प्रवास करावा लागणार नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल त्या माध्यमातून लसीकरण करणे. अनेक देशांनी अशीच लसीकरण मोहीम राबवली असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या अधिकाऱ्याने दारोदारी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम यशस्वी का होणार नाही यासंदर्भात बोलताना, एखाद्याचे तुम्ही लसीकरण केल्यानंतर त्या व्यक्तीवर लसीचा काही दुष्परिणाम होतो आहे का हे पाहणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन लसी दिल्या तर एका व्यक्तीला लस देण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. या पद्धतीने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावेल, असे सांगितले.

मुंबईत वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवरुन केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता लवकरच मुंबईमध्ये दिवसाला १० हजार कोरोनाबाधित सापडतील अशी भीती या अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. देशाच्या आर्थिक राजधानातील कोरोना परिस्थिती गंभीर होण्यासंदर्भातील चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई महानगरपालिका रुग्णालयाचे सर्व डिन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना दिवसाला १० हजार कोरोना रुग्ण आढळून येतील या पद्धतीने तयार राहण्याच्या सुचना अतिरिक्त सचिव (आरोग्य) काकानी यांनी केल्या आहेत. लवकरच शहरामध्ये दिवसाला दोन हजारहून अधिक जणांना कोरोनावरील उपचारासाठी दाखल करावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.