देशाच्या गृहमंत्र्यांना एखादा मोठा नेतो भेटतो यात चुकीचे काय आहे : संजय राऊत


मुंबई : सध्या देशभरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार-अमित शहा यांच्या भेटीत काय रहस्य आहे ? शरद पवार आणि अमित शहा यांच्यात भेट झाली की नाही याची माहिती नाही. पण अमित शहा आणि शरद पवार यांच्या भेटीत चुकीचे काही नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, यात चुकीचे काय आहे. गृहमंत्र्यांना आम्ही देखील भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर यात चुकीचे काहीच नसल्याचे संजय राऊत म्हणाले. राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. पण त्या नंतर सार्वजिनिक होतात, जसे की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी अमित शहा यांना लगावला.

देशाचे गृहमंत्री जर एखाद्या मोठ्या नेत्यासोबत बैठक घेत असतील तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. नागरिकांचा याबद्दल जाणून घेणे हक्क आहे. याबाबत काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना विचारले असता ते म्हणाले की, एखाद्या मोठ्या नेत्याला गृहमंत्री भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय बातचीत झाली हे देशाला कळायला हवे.

गुप्त बैठकीच्या बातमीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले की, गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही. नवाब मलिक यांनी भेटीच्या बातमीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना भाजपवर हल्लाबोल केला. बैठकीबद्दल भाजप अफवा पसरवत आहे. कोणतीही बैठक शरद पवार -अमित शहा या दोघांमध्ये झाली नाही. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल जयपूर थेट मुंबईत परतले होते.