शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 पर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले


शिर्डी : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट अजूनच गहिरे होत असून याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 28 मार्च 2021च्‍या कोरोना संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यानुसार साई मंदिर दर्शनासाठी आता भाविकांना समाधी मंदिर सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 यावेळेत खुले राहणार आहे. तसेच सकाळी 10 ते रात्री 7.30 यावेळेत श्री साईप्रसादालय हे सुरु राहणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानाने दिली आहे.

राज्य सरकारच्या 14 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी 16 नोव्हेंबरपासून अटी शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवू नये म्हणून संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री 8 ते सकाळी 7 यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी 7.15 ते संध्याकाळी 7.45 यावेळेत खुले राहणार आहे. रात्री 10.30 ला होणारी श्रींची शेजारती आणि पहाटे 4.30 वाजताची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल. परंतु याकरिता भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी 10 ते रात्री 7.30 यावेळेत भाविकांकरिता सुरु असणार आहे.

साईमंदिर गेल्या काही दिवसांपासून सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येत होते, पण आता पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर करण्यात आली, असून या होणा-या बदलांची साईभक्तांनी नोंद घ्यावी व कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करुन साईबाबा संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.