या गावात खेळली जाते विंचवांची होळी

भारतात होळी पर्व मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. प्रत्येक राज्यात विविध प्रथेनुसार होळी साजरी होते. वृंदावन येथे फुलांची होळी, बरसणा येथे लठमार होळी, वाराणसी येथे शव भस्म होळी साजरी होते. मध्यप्रदेशातील इटावा जवळ असे एक गाव आहे जेथे विंचू होळी साजरी होते. विशेष म्हणजे ही प्रथा शेकडो वर्षे सुरु आहे. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी शेकडो विंचू बिळांतून बाहेर पडतात आणि लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्व हे विंचू हातात घेतात. एकमेकांच्या अंगावर फेकतात.

सौन्थना गावात ही अनोखी होळी खेळली जाते. विज्ञानयुगाला या चमत्काराचे रहस्य उलगडलेले नाही. या गावाजवळ प्राचीन भैसना नावाची टेकडी आहे. तेथे विटा, दगडांचा खच पडलेला असतो. इतर दिवशी कधीही हे दगड विटा उचलून पहिल्या तर त्याखाली काहीच आढळत नाही. पण होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गावातील लहान मोठे एकत्र येऊन गायन सुरु करतात. त्यावेळी ढोल वाजला की हजारो विंचू दगडाखालून बाहेर येतात. लोक हे विंचू अंगावर घेतात, एकमेकांच्या अंगावर फेकतात पण विंचू कुणालाही दंश करत नाहीत.

वास्तविक हे विंचू विषारी आहेत. अन्य वेळी गावात कुणाला विंचू चावला तर त्याचे विष भिनते पण होळी खेळताना मात्र विष भिनत नाही. हा खेळ संपल्यावर घरी जाताना लोक या टेकडीला नमस्कार करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात. पूर्वी येथे एक मंदिर होते आणि तेथे रेडा बळी दिला जात असे. मोंगलांनी हे मंदिर उध्वस्त केले. आजही येथे मंदिरातील मूर्तींचे भग्नावशेष आहेत. स्थानिक आजही येथे भैसा बाबाची पूजा करतात, त्याला नवस करतात.