शनिवार-रविवारी पूर्णपणे बंद राहणार सोलापुरातील सर्व दुकाने


सोलापूर : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील अनेक शहरात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे वीकेंड लॉकडाऊन सोलापूर जिल्ह्यातही जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने आठवड्यातील शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहेत.

कोरोनाने राज्यात डोके पुन्हा वर काढे असून काल (बुधवारी 25 मार्च) राज्यात विक्रमी 31 हजार 855 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. सर्वांची चिंता वाढवणारा हा आकडा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई, पुणे नागपुरसह अनेक जिल्ह्यात वाढत आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत असल्यामुळे सोलापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.

शनिवार आणि रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत व्यवसाय करण्यास मुभा असणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी आणि जनावर बाजार देखील बंद राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु राहतील. सर्व धार्मिक विधीसाठी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नसेल, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा वगळून हा वीकेंड लॉकडाऊन इतर दुकानांसाठी लागू असणार आहे. नागरिकांसाठी अगोदर जारी केलेल्या आदेशानुसार केवळ रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत.