नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असून परिस्थिती बिकट होत चालली आहे. मागील २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ एवढी झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दोन आठवड्यांपासून सतत वाढत असून केंद्र सरकार वारंवार लोकांना मास्क वापरणे तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहे.
काल दिवसभरात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद
देशात मागील २४ तासात ५९ हजार ११८ नवे रुग्ण आढळले असून ३२ हजार ९८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ एवढी झाली असून १ कोटी १२ लाख ६४ हजार ६३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
सध्या देशात ४ लाख २१ हजार ६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ६० हजार ९४९ एवढी आहे. आतापर्यंत देशात ५ कोटी ५५ लाख ४ हजार ४४० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.