मुंबईतील मॉलला लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू


मुंबई : रात्री 12 वाजताच्या सुमारास भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये भीषण आग लागली असून सनराईज हे कोव्हिड रुग्णालय या मॉलमध्ये आहे. कोव्हिड रुग्णालयातील दोन जणांचा काल रात्री लागलेल्या या आगीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या 20 पेक्षा जास्त गाड्या आगीच्या या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश ककाणी हे देखील दाखल झाले. बचाव कार्य मागील अनेक तासांपासून सुरु आहे.

प्रथमतः ही आग पहिल्या मजल्यावर लागली आणि ती वाढत जाऊन वरच्या रुग्णालयापर्यंत पोहचली. रुग्णालयात लागली तेव्हा 76 रुग्ण होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. पण नंतर ही आग प्रचंड वाढली असून अजून ही त्यात काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महापौरांनी या मॉलमध्ये रुग्णालय कसे केले गेले या बद्दल आश्चर्य व्यक्त केले असून या बाबत चौकशी होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दोन जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाल्याचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले. बचाव कार्य मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. ही आग कशी लागली याची चौकशी बचाव कार्य संपल्यानंतर करण्यात येणार असल्याचे महापौरांनी आणि उपायुक्तांनी स्पष्ट केले.

सनराईज रुग्णालयच्या म्हणण्यानुसार, या आगीत जे दोन रुग्ण दगावले ते आगीमुळे दगावले नाही. त्यांचा मृत्यू आगीमुळे झालेला नाही, कोरोना उपचारादरम्यान आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या फॉर्मलिटीज काम बाकी होते, त्यामुळे शव रुग्णालयात होते. आग लागली तेव्हा अलार्म वाजल्यानंतर ताबडतोब सर्व लाइट्स कनेक्शन बंद केले आणि रुग्णांना बाहेर काढले. 76 च्या आसपास रुग्ण आतमध्ये होते, त्यात दोन जणांचा आधीच मृत्यू झाला होता. आता त्यांना जवळच्या मुलुंड जम्बो कोव्हिड सेंटर आणि फॉरटीस रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत या मॉलच्या टॉप फ्लोअरवर हे हॉस्पिटल निर्माण करण्यात आल्याचे सनराईज हॉस्पिटलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, हे हॉस्पिटल आगीचे आणि इतर सर्व नियमांचे पालन करून सुरु असून आताच्या आगीमध्ये स्टाफने बचावकार्यात मोलाचे योगदान दिल्याचेही हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.