ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर


मुंबई – राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल, अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना देण्याचे निश्चित करण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी या निवडीनंतर आशाताईंचे अभिनंदन केले.