न्यायालयाने आलिया आणि संजय लीला भन्साळीला बजावले समन्स


दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी व बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या चित्रपटाला सातत्याने विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाचे लेखक यांना मुंबईतील माझगाव न्यायालयाने समन्स बजावले आहे.

या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे की, ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाद्वारे त्यांच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. गंगूबाई काठियावाडी यांच्या मुलाने ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मुलाचे बाबू रावजी शाह असे नाव आहे. गंगूबाई काठियावाडी यांनी दत्तक घेतलेल्या चार मुलांपैकी एक असल्याचा दावा बाबूने केला आहे. तथ्यहीन गोष्टी या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. माझी आणि माझ्या कुटुंबाची या चित्रपटामुळे बदनामी होत असल्याचे त्याने या याचिकेत म्हटले आहे. या सर्वांना २१ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास मुंबईच्या मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारीत ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट असून हे पुस्तक हुसैन जैदी यांचे आहे. आलिया भट्ट या चित्रपटात गंगूबाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अजय देवगण आणि विक्रांत मेसी यांची मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.