कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय


मुंबई – कॅन्सरग्रस्तांच्या सोयीसाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे म्हाडाचे १०० फ्लॅट्स सोपवले जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज(गुरूवार) पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्यासोबत यावेळी मुंबईतील टाटा हॉस्पिटलचे अधिकारी देखील उपस्थित होते.

आव्हाड यावेळी म्हणाले, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे व असे अनेकदा दिसून येते की बरेच रूग्ण किंवा रूग्णांच्या नातेवाईकांना मुंबईतील रस्त्यांवर पडून रहावे लागतं. हे दृश्य पाहून अत्यंत वाईट वाटते. म्हणून आम्ही मानवतेच्यादृष्टीने असा विचार केला की, आमच्याकडे जेवढे काही फ्लॅट्स आहेत, ते आम्ही आज १०० व आगामी काळात ते वाढवून २०० करणार आहोत आणि ते फ्लॅट्स आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे सोपवणार आहोत.

त्यानंतर म्हाडाचा त्या फ्लॅट्सशी काहीच संबंध राहणार नाही. याचे कारण असे आहे की यामध्ये राजकीय हस्तक्षेप येईल. तो आम्हाला नको आहे, ज्यांना खरच गरज आहे, त्यांनाच त्याचा लाभ मिळायला हवा. आम्ही हे फ्लॅट्स यासाठी टाटाला देण्याचा निर्णय़ घेतला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केवळ सात दिवसांमध्ये झाली. याचा मला अभिमान आहे. टाटा व म्हाडामध्ये तसा करार देखील झालेला आहे. करीरोड स्टेशनच्या बाजूला व टाटा कॅन्सर हॉस्पिटलपासून पाच मिनिटांच्या अंतरावर हे फ्लॅट्स आहेत.