महिलांनी यामुळेच आपली फिगर गमावली, द्रमुकच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य!


चेन्नई – तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारासाठी द्रमुक आणि अद्रमुक या दोन्ही प्रमुख पक्षांचे अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत. काही नेतेमंडळींनी प्रचारादरम्यान केलेली वक्तव्ये मोठा वाद निर्माण करतात. द्रमुकचे नेते दिंडिगल लिओनी यांनी केलेले असंच एक वक्तव्य वादाचा विषय ठरले आहे. महिलांबद्दल द्रमुकच्या नेत्याने गंभीर वक्तव्य केले आहे. आपल्याकडच्या महिलांनी परदेशी गायींचे दूध प्यायल्यामुळेच फिगर गमावली असून त्या जाड झाल्याचे दिंडिगल लिओनी म्हणाले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होऊ लागली आहे.


द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिंडीगल लिओनी हे नेते असून ते कोइम्बतूरमध्ये पक्षाचे उमेदवार कार्तिकेय सिवसेनापती यांच्यासाठी प्रचार करत होते. सेनापती केनगयम कॅटल रिसर्च फाऊंडेशनचे सिवसेनापती हे ट्रस्टी देखील आहेत. त्यासंदर्भात बोलताना लिओनी म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, की आपल्याकडे अनेक प्रकारच्या गायी असतात. तुम्हाला शेतामध्ये हल्ली परदेशी प्रजातीच्या गायी दिसतील.

या गायींसाठी लोक दूध काढायचे मशिन वापरतात. त्या दिवसाला ४० लिटर दूध देताता. ते दूध प्यायल्यामुळे आपल्या सगळ्या महिला फुग्याप्रमाणे जाड झाल्या आहेत. महिलांची फिगर आधी (इंग्रजीतल्या) आठ आकड्यासारखी होती. मुलांना त्या कंबरेवर ठेवत असत. पण जर त्यांनी आता मुलांना तसे ठेवलं, तर मुले देखील घसरून पडतील. कारण महिला आता बॅरलसारख्या झाल्या आहेत. आपली सगळी मुले देखील जाड झाली असल्याचे लिओनी म्हणाले आहेत.

विशेष म्हणजे, एका कार्यकर्त्याने लिओनी हे सगळे बोलत असताना त्यांच्या हातात रेशनिंगचा तांदूळ देऊन त्याच्या दर्जावर त्यांनी बोलावे असं सुचवण्याचा प्रयत्न केला. ते त्यावर थोडा वेळ बोलले देखील. पण पुन्हा ते महिलांबाबतच्या आपल्या मूळ विषयावर आले, असे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कनिमोळी यांच्याकडे लिओनी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.