पुणेकरांवर कोरोनासंदर्भात नवे निर्बंध नाही: आयुक्त सौरभ राव


पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच पुणेकरांवर कुठलेही नवे निर्बंध न लादण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याउलट कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणावर आणि आरोग्य व्यवस्था सुधारणेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक वेगाने वाढत असल्यामुळे पुण्याला लसीकरणात प्राधान्य मिळावे, अशी मागणी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.

पुण्यातील 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण दिल्यास दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होईल, असा सल्ला आरोग्य विषयातील तज्ज्ञांनीही दिल्याचे राव यांनी सांगितलं. सकाळी पालकमंत्री अजित पवार, मनपा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काऊन्सिल हॉल येथे पुण्यातील कोरोना स्थितीविषयी बैठक झाली. या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेतली.

पुणेकरांसाठी असे आहेत नवीन नियम?

  • 31 मार्चपर्यंत पुण्यातील शाळा – महाविद्यालये बंद राहतील.
  • यातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना सूट देण्यात आली आहे.
  • दहा वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु राहतील. तसेच 11 वाजेपर्यंत होम डिलीव्हरी करता येईल.
  • त्याचबरोबर एकुण आसनक्षमतेच्या पन्नास टक्केच लोकांना परवानगी असेल.
  • लग्न समारंभ , धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम , अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांना परवानगी असेल.
  • नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल.
  • फक्त सकाळी पुण्यातील बागा सुरू राहतील तर संध्याकाळी बंद असतील.
  • रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचार बंदी असेल.
  • एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि लायब्ररीच्या पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना वापरता येणार आहेत.
  • रात्री दहा वाजेपर्यंत थिएटर, मॉल्स आणि दुकाने सुरु राहतील.