आढळरावांबद्दल केलेल्या पोस्ट प्रकरणी खासदार अमोल कोल्हेंच्या बंधुंवर गुन्हा दाखल


पुणे : अदखलपात्र गुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या भावाविरोधात दाखल करण्यात आला आहे. माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्याबद्दल अर्वाच्य भाषेत खासदारांचे सख्खे बंधू सागर कोल्हे यांनी टिपणी केली आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये फेसबुकवर पोस्ट केलेल्या या टिपणी प्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. यासंदर्भातील तक्रार मंचरमधील स्थानीय नेते दत्ता गांजळेंनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकासआघाडीच्या सत्तेत असले तरी शिरूर लोकसभेत मात्र आघाडीचा धर्म वेळोवेळी पायदळी तुडवला जात असल्याचे या प्रकरणामुळे ते पुन्हा एकदा अधोरेखित झाल आहे.

या मतदारसंघातील शिरूर लोकसभा हद्दीतून जाणारा पुणे-नाशिक मार्ग आणि त्याअनुषंगाने निर्माण होणारे प्रश्न, हा एक ज्वलंत मुद्दा आहे. आजी-माजी खासदारांमध्ये ते प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने आणि त्याच्या श्रेयवादावरून नेहमीच कलगीतुरा रंगतो. अशातच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला मंजुरी मिळाली. ही मंजुरी अद्याप कागदापुरती मर्यादित असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात व्हायला आणखी बराच काळ लोटणार आहे. हे उघड असतानाच विद्यमान खासदार कोल्हे आणि माजी खासदार आढळराव यांच्यात श्रेयाचे राजकारण रंगले आहे.

पण खासदार कोल्हे यांचे बंधू सागरने यात उडी घेतली अन प्रकरणाला वेगळे वळण लागले. अतिउत्साहीपणात सागरने फेसबुक पोस्ट केली, यात आढळरावांबद्दल अर्वाच्य भाषेत टिपणी केली. सागरने आढळरावांचे ज्येष्ठत्व विसरून दाखवलेल्या आततायीपणावर सोशल मीडियातून नाराजीचा सूर पहायला मिळाल्यामुळे संतापलेल्या आढळरावांच्या समर्थकांनी मंचर पोलीस स्टेशन गाठले. याबाबत स्थानिक नेते दत्ता गांजळेंनी तक्रार दाखल केली, त्यानुसार अर्वाच्य भाषा आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. त्यामुळे सागर कोल्हे यांना हे प्रकरण आता भोवताना दिसत आहे.

आधी कुटुंबातील सदस्यांना विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी संस्कृती शिकवावी मग राजकारण करावे. माझे बंधू ही राजकारणात सक्रिय होते, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यांचे माझ्या विरोधकांशी देखील मैत्रीपूर्ण संबंध होते, त्यांनी कधीच पातळी ओलांडली नव्हती. पण खासदारांच्या बंधूने आज पातळी ओलांडून असंस्कृतपणाचे दर्शन घडवले, हे खूप लाजिरवाणे आणि चुकीचे आहे. अशी टिपणी म्हणजे जनतेला यांनी गृहित धरत, प्रसिद्धीसाठी कुछ भी करणे, हे चुकीचे आहे. राजकारणात अशा गोष्टींना आवर घालायला हवा, असा सल्ला आढळरावांनी कोल्हे कुटुंबियांना दिला.

दरम्यान माझे बंधू सागर कोल्हे यांनी चुकीची भाषा वापरली, याबाबत मी स्वतः माजी खासदार आढळराव पाटील यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. तीन वेळा खासदार राहिलेल्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल अशी भाषा योग्य नसल्याचे मी जाणतो. म्हणूनच फेसबुकवरील त्या पोस्ट ही डिलीट करण्याच्या सूचना मी तातडीने दिल्या आहेत. राजकारणात सुसंस्कृतपणा जपला पाहिजे याच मताचा मी आहे आणि त्यानुसारच मी आत्तापर्यंत वागत आलेलो आहे, असे यावर स्पष्टीकरण खासदार अमोल कोल्हे यांनी दिले आहे.