बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई : एका व्यक्तीने महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्यात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. एका व्यक्तीने विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला पोलिसांनी वेळीच अडवले आणि मोठा अनर्थ टळला. या व्यक्तीचे नाव पांडुरंग वाघ असे असून तो अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

अहमदनगर नेवासा येथील झापडी गावाचे पांडुरंग वाघ हे रहिवाशी आहेत. 2018 मध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीचा वाघ यांनी शासनाकडून परवाना मिळवला होता. त्यांनी त्यासाठी शासनास 8 लाख 72 हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केले होते. पण वाळू उपसा स्थानिकांच्या विरोधामुळे झाला नाही. गावकऱ्यांच्या वारंवार विरोधामुळे वाघ यांचे नुकसान होत होते. वाळू उपसण्याचे काम शासनाकडून मिळाल्यानंतर सुद्धा वाघ त्यांना ते काम करता येत नसल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.

स्थानिकांना समजावण्याचा वाघ यांनी प्रयत्न केला, काम सुरू करण्यासाठी अटी शर्तीचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना काही यश न आल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा शासनाचे दार ठोठावले आणि शासनाकडे भरलेले आपले पैसे परत मिळावे म्हणून यांनी पाठपुरावा सुरू केला होता.

आपण भरलेले 8 लाख 72 हजार रुपये लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण पोलीसांनी वाघ यांना योग्य वेळी अडवले आणि आत्महत्या करण्यापासून रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी 41 (1) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असे पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.