आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये टीम इंडियाची दुसऱ्यास्थानी झेप


नवी दिल्ली – आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारत कसोटी क्रिकेटमध्ये आधीच पहिल्या क्रमांकावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडकडून पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-२ ने पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे.

सध्या इंग्लंड पहिल्या क्रमांकावर असून भारतापेक्षा सात गुणांनी पुढे आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये लवकरच पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून यावेळी भारताला हे अंतर कमी करण्याची संधी आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंच न्यूझीलंडविरोधात चांगली कामगिरी केल्यानंतर टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर के एल राहुल पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली सहाव्या स्थानी कायम आहे.

विशेष म्हणजे टी-२० गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या क्रमांकावर आहे, तर मोहम्मद नब्बी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल आहे.