सचिन वाझे म्हणजे लादेन नाही; विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले


मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचे आणि त्याला आयुष्यातून उठवायचे अशी पद्धत सध्या सुरू असल्याचे सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्र तयार केले जात आहे. ते कशासाठी?, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजा चव्हाण प्रकरण ते मनसुख हिरेन प्रकरणामुळे गाजलेल्या या अधिवेशनामुळे पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कोरोनात अधिवेशन घेणे आव्हानात्मक होते. पण अधिवेशन नियम पाळून घेतले. उत्तम सहकार्य विरोधकांनीही केले. परवा अर्थसंकल्प सादर केला. आव्हानात्मक स्थिती असतानाही हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तरीही रडगाणे न गाता महाराष्ट्र कधी थांबला नाही आणि थांबणार नाही, हे आपले ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार सर्व घटकांना आपण सामावून घेण्याचा, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.