शरीरातील कॅल्शियमची कमतरता कशी ओळखावी?

calcuim
आपल्याला दिवसभरामध्ये कराव्या लागणाऱ्या शारीरिक मेहनतीसाठी आपल्या शरीरातील हाडे आणि स्नायू बळकट असणे गरजेचे असते. यासाठी शरीराला आपल्या आहारातून योग्य पोषण मिळणे महत्वाचे असते. याच पोषक तत्वांमध्ये कॅल्शियमचा समावेश असून, शरीरासाठी हा अत्यावश्यक क्षार आहे. वैद्यकीय सल्ला विचारात घेतला, तर आपल्या शरीराला साधारण एक हजार मिलीग्राम्स इतकी कॅल्शियमची दैनंदिन आवश्यकता असते. गर्भवती महिला, किंवा बाळाला स्तनपान करविणाऱ्या महिलांमध्ये ही गरज १२०० ते १३०० मिलीग्राम पर्यंत असते.
calcuim1
शरीरामध्ये जर सातत्याने कॅल्शियमची कमतरता असेल, तर त्यामुळे थोड्याश्या इजेने देखील हाडे मोडणे, हाडे ठिसूळ होणे अशा समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आपल्या आहारातून आपल्याला पुरेसे कॅल्शियम मिळेल याची खबरदारी घेणे आवश्यक असते. शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यास त्याची लक्षणे त्वरित दिसून येत नाहीत. मात्र काही काळाने चालताना किंवा जिने चढताना, धावताना, स्नायूंमध्ये थोड्याश्या श्रमांनी देखील क्रँप्स येऊ लागतात. हे क्रँप्स पाठीमध्ये आणि पायांमध्ये जाणवतात. शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाल्यास केसगळती सुरु होते आणि हाता-पायांच्या बोटांची नखे ठिसूळ होऊन सहज तुटू लागतात.
calcuim2
क्वचित हातापायांच्या बोटांना मुंग्या येणे, बोटे सुन्न होणे हे ही कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. कॅल्शियम हा क्षार शरीरातील नर्व्हज् ला संकेत पाठविण्याच्या कामी महत्वाचा ठरत असल्याने या क्षाराच्या कमतरतेमुळे संकेत पाठविण्याच्या कामामध्ये अडथळे येऊन हाता-पायांच्या बोटांना मुंग्या येऊन क्वचित बोटे सुन्न होऊ शकतात. शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता सातत्याने असल्यास हृदयाचे ठोके अनियमित गतीने पडू शकतात. कॅल्शियम हृदयाच्या स्नायूंना सक्रीय ठेवत असल्याने याच्या कमतरतेमुळे थोड्याश्या श्रमांनी दम लागणे, छातीमध्ये क्वचित वेदना उद्भवणे, अशा समस्या उद्भवू शकतात. हाडांना लहानशा धक्क्याने देखील होणारी इजा हे कॅल्शियमची कमतरता असण्याचे लक्षण आहे.
calcuim3
शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेचे निश्चित निदान काही वैद्यकीय तपासण्यांच्या द्वारे केले जाऊ शकते. जर कॅल्शियमची कमतरता आढळली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि आहारामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ जास्त मात्रेमध्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता असते. तसेच आपण खात असलेले कॅल्शियम शरीरामध्ये योग्य प्रकारे अवशोषित होईल असा पूरक आहार किंवा सप्लीमेंटस घेणे ही आवश्यक असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment