भीमाला दशसहस्र हत्तींचे बळ कसे लाभले?

bhim
महाभारतामध्ये अनेक बलशाली, कुशल योद्ध्यांचा उल्लेख आहे. कोणी धनुर्विद्येत पारंगत होते, तर कोणी गदायुद्धामध्ये कुशल होते. अशा योद्ध्यांच्या समोर युद्धास उभे ठाकणे म्हणजे मृत्युला आमंत्रणच म्हटले जात असे. अशाच योद्ध्यांपैकी एक होता पांडूपुत्र भीम. भीम गदायुद्धामध्ये कुशल होताच, पण त्याशिवाय त्याला दशसहस्र, म्हणजेच दहा हजार हत्तींचे बळही प्राप्त होते. या बळाच्या जोरावर भीमाने नर्मदा नदीचा अतिशय गतिमान प्रवाहही रोखून धरला असल्याची कथा सर्वश्रुत आहे. खरे तर भीम कोणी चमत्कारी पुरुष किंवा एखाद्या देवाचा अवतार नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे दिसणाऱ्या भीमाच्या अंगात इतके बळ कसे आले, या रहस्याची उकल करणारी अतिशय रोचक कथा प्रचलित आहे.
bhim1
भीम लहानपणापासूनच धष्टपुष्ट, आणि बलशाली होता. धावण्याच्या शर्यतीत, कुस्ती खेळण्यात, त्याचा मुकाबला करणे पांडव किंवा कुरव कोणालाच शक्य नव्हते. कौरवांच्या प्रती भीमाच्या मनामध्ये द्वेष नसला, तरी दुर्योधनाच्या मनामध्ये मात्र भीमाबद्दल अतिशय मत्सर, असूया होती. त्यामुळे योग्य संधी मिळताच भीमाला जीवे मारण्याचा विचार दुर्योधनाच्या डोक्यामध्ये पक्का होता. एकदा गंगेच्या तीरी खेळ खेळण्यासाठी दुर्योधनाने ‘उदकक्रीडन’ नामक शिबिराचे आयोजन करविले. या शिबिरामध्ये निरनिराळे खेळ खेळण्याची, खाण्या-पिण्याची सर्व व्यवस्था करविण्यात आली. दुर्योधनाने पांडवांनाही या शिबिरासाठी आमंत्रित केले.
bhim2
एक दिवस संधी मिळताच दुर्योधनाने भीमाच्या भोजनामध्ये विष मिसळले. भीमाने हे भोजन घेताच त्यामध्ये असलेल्या विषामुळे तो बेशुद्ध झाला. भीमाची शुद्ध हरपल्याचे पाहून दुर्योधनाने दु:शासानाच्या मदतीने भीमाला गंगेत सोडून दिले. पाण्याच्या प्रवाहातून वाहत जाऊन भीम मूर्च्छित अवस्थेमधेच नागलोकामध्ये पोहोचला. जेव्हा भीमाला शुद्ध आली, तेव्हा त्याच्या आजूबाजूला सगळीकडे सर्प पाहून भीमाने त्यांना मारण्यास सुरुवात केली. भीमाचा आवेश पाहून सर्व सर्प घाबरले आणि नागराज वासुकीकडे गेले. तिथे सर्व हकीकत त्यांनी वासुकीला कथन केली.
bhim3
सर्व हकीकत जाणून घेऊन नागराज वासुकी स्वतः आर्यक नागाला समवेत घेऊन भीमाच्या भेटीस गेले. तिथे पोहोचताच आर्यक नागाने भीमाला ओळखले. त्यांनी भीमाला आपल्यासमवेत नागलोकामध्ये आणले. नागलोकामध्ये आठ चमत्कारी जलकुंडे होती. या कुंडांच्या पाण्यामध्ये दशसहस्त्र हत्तींचे बळ देण्याची ताकद होती. वासुकीच्या परवानगीने आर्यकाने भीमाला या कुंडांचे पाणी प्यावयास दिले. या कुंडांचे पाणी पिऊन भीम दिव्य शैय्येवर निजला. भीम आठ दिवस निद्रावस्थेतच होता. नवव्या दिवशी जेव्हा भीमाला जाग आली, तेव्हा आपल्याला दशसहस्र हत्तींचे बळ लाभले असल्याचे त्याला समजले.
bhim4
त्यानंतर भीम हस्तिनापुरी परतला, व दुर्योधनाने विष देण्यापासून ते आपल्या दशसहस्र हत्तींचे बळ कसे लाभले ही सर्व हकीकत त्याने कुंती आणि इतर पांडवांना कथन केली. अशा रीतीने भीमाला दहा हजार हत्तींचे बळ प्राप्त झाले असल्याची कथा प्रचलित आहे.

Leave a Comment