रविवारपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग


नवी दिल्ली – दिवसोंदिवस देशामधील बेरोजगारी वाढत असून आता याच समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केली आहे. रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. सहा लाख ७४ हजारांहून अधिक जणांनी या हॅशटॅगवर ट्विट केले आहे. भाजपने सत्तेत येताना दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलेले त्याचे काय झाले, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. मोदी रोजगार दो हा हॅशटॅग भारतातील राजकीय विषयांमध्ये टॉप ट्रेण्डींग विषय आहे.


हा हॅशटॅग वापरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विटरवरुन केंद्र सरकारला, ‘सुनो जन के मन की बात’ असा सल्ला दिला आहे.

देशातील बेरोजगारांची संख्या कोरोनाच्या कालावधीमध्ये झापट्याने वाढली. आयएलओच्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर बेरोजगारी ५७ टक्क्यांपर्यंत आहेत. तर भारतामध्ये ही बेरोजगारी ४७ टक्क्यांपर्यंत आहे. भारताचे शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर आहे. पाकिस्तानमध्ये ५० टक्के तर श्रीलंकेमध्ये ५१ टक्के बेरोजगारी असून बांगलादेशमध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५७ टक्क्यांपर्यंत आहे.

लाखो लोकांनी कोरोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये रोजगार गमावला होता. सीएमआयईईच्या अहवालानुसार एक कोटी ७७ लाख पगारदार व्यक्तींनी २०२० मध्ये आपला रोजगार गमावला. खास करुन मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाल्यानंतर जून आणि जुलैपर्यंत अनेकांनी आपला रोजगार गमावल्यामुळेच आता अर्थव्यवस्था हळूहळू सुरळीत होत असतानाच सरकारने दिलेले आश्वासन पाळत बेरोजगारांना नोकरी द्यावी अशी मागणी ट्विटरच्या माध्यमातून केली जात आहे. जागतिक स्तरावर बेरोजगारी हे संकट असून सध्या जागतिक अर्थव्यवस्थेसमोर रोजगार उपलब्ध करुन देणे हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर सर्व विक्रम अमेरिकेतील बेरोजगारीने मोडित काढले आहेत. अमेरिकेमध्ये नोकऱ्यांची नव्या संधीच उपलब्ध नाही.