कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय


पुणे – गेल्या चार दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. चार दिवसांमध्ये शहरात जवळपास एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ लाख ३ हजार १९८ जण बाधित रुग्ण असून पैकी ९८ हजार २५७ जण ठणठणीत बरे झाले आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या १८३० एवढी आहे. दरम्यान, शहरातील बंद करण्यात आलेले जम्बो कोविड आणि इतर कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

राजेश पाटील यावेळी म्हणाले की, काही निर्बंध गर्दीच्या ठिकाणी आणता येतील का यासंबंधी काही पावले उचलली जाणार आहेत. कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहेत. अगोदर २००० चाचण्या होत होत्या त्या वाढवून ३००० करणार असून मास्क, सॅनिटायझर नागरिकांनी वापरावे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की, कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचारी यांना घेण्यात आले होते. कोविड सेंटर शासनाच्या निर्देशानंतर बंद करण्यात आले होते. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ते कोविड सेंटर पुन्हा ठराविक अंतराने सुरू करणार आहोत. त्याचबरोबर लवकरच आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा रुजू करण्याचा निर्णय घेऊ. कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. महानगरपालिका आणि राज्य प्रशासनाला कोरोनाचे सर्व नियम पाळून सहकार्य करावे. पुढील सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यास लॉकडाऊनची परिस्थती उद्भवणार नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.