नवी दिल्ली – टाटा मोटर्सची नवीन टाटा सफारी दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज भारतात अधिकृतरित्या लाँच करण्यात आली आहे. टाटाची ही आयकॉनिक एसयूव्ही गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. नव्या सफारीच्या किंमतीचाही आता कंपनीने खुलासा केला आहे.
XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ अशा सहा व्हेरिअंट्समध्ये टाटा मोटर्सने आपली नवीन सफारी आणली आहे. यासोबतच कंपनीने ही एसयूव्ही 6-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही मॉडेलमध्येही लाँच केली आहे. यात 7-सीटर मॉडेलमधील सफारी सर्व व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे, पण केवळ XZ+ या व्हेरिअंटमध्येच 6-सीटर मॉडेल उपलब्ध असेल. डायटोना ग्रे, रॉयल ब्लू आणि ऑर्कस व्हाइट अशा तीन रंगांच्या पर्यायात 2021 Tata Safari लाँच करण्यात आली आहे.
18-इंचाचे अॅलॉय व्हील्स नवीन सफारीमध्ये आहेत, त्याचबरोबर Tata Harrier च्या तुलनेत नवीन सफारी 63 मिलीमीटर लांब आणि जवळपास 80 मिलीमीटर उंच आहे. शिवाय नवीन सफारीचं फ्रंट लूक री-डिझाइन करण्यात आले असून यात क्रोम एलिमेंट्सही दिले आहेत. सफारीच्या मागील बाजूलाही नवीन एलईडी टेललॅम्पसोबत री-डिझाइन लूक बघायला मिळेल.
प्रजासत्ताक दिनी नवीन सफारीवरुन टाटा मोटर्सने पडदा हटवला होता. त्यानंतर देशातील कोणत्याही टाटा मोटर्सच्या अधिकृत डिलरशीपमध्ये या एसयूव्हीसाठी 4 फेब्रुवारीपासून 30 हजार रुपयांमध्ये बूकिंगला सुरूवात झाली. पण, या गाडीच्या किंमतीबाबत अद्याप कंपनीने घोषणा केली नव्हती. पण कंपनीने आज किंमत जाहीर केली आहे.
टाटाची ही सफारी आयकॉनिक एसयूव्ही आहे. या एसयुव्हीचा नवीन अवतार अधिक दमदार असून या एसयूव्हीला नवीन सफारीची रचना, कार्यक्षमता, मल्टी टास्किंग, सेवा आणि दीर्घकाळ टिकणारी डेव्हलपमेंट क्वालिटी ही वैशिष्ट्ये पूर्वीपेक्षा अधिक दमदार बनवतात.
“OMEGARC” (Optimal Modular Efficient Global Advanced Architecture) प्लॅटफॉर्मचा वापर नवीन Tata Safari मध्ये कंपनीने केला आहे. जो लँड रोव्हरच्या D8 प्लॅटफॉर्मपासून घेण्यात आला आहे. टाटाच्या नवीन सफारीची इंटिरिअर थीम Oyster White रंगात असून कंपनी यासोबत Ash Wood डॅशबोर्डही देण्यात आला आहे. तसेच कंपनीने व्हील आणि फ्रंटसाईडवर क्रोम फिनिश लूक दिला आहे.
नवीन सफारीत नवीन एक्सटिरियर पेंट पर्याय, नवीन अलॉय व्हील्स, आतल्या बाजूला सिग्नेचर-स्टाईल डुअल-टोन डॅशबोर्ड, तीन-स्पोक स्टिअरिंग व्हील्स, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसह 8.8 इंचांची फ्लोटिंग इन्फोटेन्मेंट सिस्टिम, व्हॉईस रेकग्नायजेशन, 7-इंचाचा इंस्ट्रूमेंट पॅनल असेल. याशिवाय गाडीमध्ये तपकिरी रंगाची लेदर सीट आणि जेबीएल स्पीकर्सही असतील. या एसयूव्हीचे उत्पादन पुण्यातील टाटाच्या प्लांटमध्ये सुरू आहे.
2.0 लिटर, 4-सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन नवीन टाटा सफारीत मिळेल. हे इंजिन 170 BHP पॉवर आणि 350 Nm टॉर्क निर्माण करते. त्याचबरोबर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स असेल. याशिवाय इको, सिटी आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड नवीन सफारीमध्ये आहेत. तसेच, तीन ESP टेरेन रिस्पॉन्स मोड (नॉर्मल, रफ आणि वेट Normal, Tough and Wet) देखील या एसयूव्हीमध्ये आहेत.
टाटा मोटर्सने नवीन सफारीची बेसिक एक्स-शोरुम किंमत 15 लाखांपेक्षाही कमी ठेवली आहे. या एसयूव्हीची बेसिक एक्स-शोरुम किंमत 14.69 लाख रुपये एवढी आहे, तर टॉप व्हेरिअंटची किंमत 21.45 लाख रुपयांपर्यंत आहे. भारताच्या ऑटो मार्केटमध्ये टाटा सफारीची टक्कर नवीन जनरेशन Mahindra XUV500, 7 सीटर Hyundai Creta, MG Hector Plus, Toyota Innova Crysta यांसारख्या एसयूव्हींसोबत असेल.