राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण


मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून यासंदर्भात माहिती स्वतः छगन भुजबळ यांनी ट्विट करुन दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी ट्विटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आणि लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करुन घेण्याचे आवाहनही केले आहे.

ट्विट करत आपल्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ यांनी आपल्या ट्विटमध्ये माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा.

काल नाशिक येथे त्यांनी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीला देखील ते उपस्थित होते. बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

सहा मंत्र्यांना आठवड्याभरात कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री बच्चू कडू, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, भाजप खासदार रक्षा खडसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाची लागण झाली आहे.