अनिल देशमुखांनी अखेर ‘त्या’ व्हायरल फोटोवर सोडले मौन


मुंबई – सध्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख चर्चेत असून सोशल मीडियात सध्या औरंगाबाद दौऱ्यातील व्हायरल होत असलेला एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. अनिल देशमुखांसोबत या फोटोमध्ये तीन सराईत गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने या फोटोवरुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गृहमंत्रीपद अनिल देशमुख यांच्याकडे असल्यामुळे याकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

औरंगाबाद दौऱ्यावर मी गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन, असे अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. जो फोटो अनिल देशमुखांचा व्हायरल झाला आहे, त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत.

औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्येही होता. सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून ओळख आहे.