भारतीय वंशाच्या भव्या लालची ‘नासा’च्या प्रमुख कार्यवाहकपदी नियुक्ती


वॉशिंग्टन – जगातील सुप्रसिद्ध आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाची सुत्रे भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलेच्या हाती देण्यात आली आहेत. ‘नासा’च्या प्रमुख कार्यवाहक म्हणून भारतीय वंशाच्या डॉ. भव्या लाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. भव्या लाल यांचे नाव अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी निवडलं आहे. अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा भव्या लाल यांना चांगला अनुभव आहे. नासाच्या इनोव्हेटिव्ह अॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट्स प्रोग्राम आणि नासा अ‍ॅडव्हायझरी कौन्सिलच्या तंत्रज्ञान, नाविन्य आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या बाह्य परिषदेच्या भव्या लाल सदस्य देखील राहिल्या असल्याचे ‘नासा’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

२००५ ते २०२० पर्यंत डॉ. भव्या लाल यांनी इन्स्टिट्यूट फॉर डिफेंस अॅनालिसिस साइंस अँड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टिट्यूट (STPI)च्या रिसर्च स्टाफच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. त्या STPI मध्ये सहभागी होण्याअगोदर C-STPS LLC च्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. याशिवाय ‘केंब्रिजमधील मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राच्या त्या संचालक होत्या. अमेरिकेच्या न्यूक्लियर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले आहे.

अणु विज्ञानात भव्या लाल यांनी बीएससी आणि एमएससी पदवी प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय अकॅडमी ऑफ अॅरोनॉटिक्सच्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. यासोबतच तंत्रज्ञान आणि धोरण विभागातही पदवी प्राप्त केली आहे. सार्वजनिक धोरण आणि प्रशासनात त्यांनी डॉक्टरेट केली आहे.