धनंजय मुंडे प्रकरणी आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झाले आहे… शरद पवारांची प्रतिक्रिया


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने त्यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे. आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज असल्याचे मी आधीच म्हटले होते. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नसून आम्ही योग्य असल्याचे आता सिद्ध झाले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप करुन राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता रेणू शर्माने तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचे सांगितले. रेणू शर्माने काही दिवसांपूर्वीच मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते, असे ट्विट केल्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.