आगीच्या दुर्घटनेनंतर आज तीन देशांना सीरमने केला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा


पुणे – गुरुवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. पाच जणांचा या आगीमध्ये मृत्यू झाला. या आगीमुळे सुदैवाने ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या या जीवरक्षक लसीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मागील शनिवारपासूनच देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीचे डोस आतापर्यंत लाखो लोकांना देण्यात आले आहेत. दरम्यान या आगीच्या दुर्घटनेनंतर सीरम इन्स्टिट्यूटने आज म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पुरवठा केला आहे.

दरम्यान मी सर्व सरकारी संस्था आणि लोकांना हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. अशी एखादी घटना सीरम इन्स्टिट्यूटमध्ये घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवल्याची माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. त्यांनी याच ट्विटमध्ये पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.

पाच जणांचा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत मृत्यू झाला आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून या मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे. आज सीरमसाठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या कुटंबांना नियमानुसार जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, पण त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत करत असल्याचे सायरस पुनावाला यांनी जाहीर केले आहे.