टेस्लाचा प्रकल्प कर्नाटकात गेल्यामुळे मनसेने साधला आदित्य ठाकरेंवर निशाणा


मुंबई – इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामधील जगातील आघाडीची ऑटो कंपनी टेस्लाने अखेर भारतात पदार्पण केले असून भारतातील आपल्या व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी टेस्लाने आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली आहे. महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून बहुचर्चित टेस्ला कंपनी व्यवसायाला सुरूवात करणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावरुन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.


यापूर्वी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण आदित्य ठाकरे यांनी दिले होते. टेस्ला टीमशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत टेस्लाला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण आदित्य ठाकरेंनी दिले होते. तसेच हे निमंत्रण केवळ गुंतवणूकीसाठी नाही तर भविष्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीचा विचार करुन दिल्याचे त्यांनी सांगितले होते. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती.संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंच्या त्याच ट्विटला रिप्लाय देताना टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका, असं ट्विट करत आदित्य यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, टेस्ला मोटर्स इंडिया अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड नावाने टेस्ला कंपनीने बंगळुरूमध्ये रजिस्ट्रेशन केले आहे. यासोबतच तीन डायरेक्टर्सचीही कंपनीने नियुक्ती केली आहे. टेस्ला भारतात लग्जरी इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन घेईल.