नवाब मलिक यांचा जावई मुच्छड पानवाल्यामुळे अडचणीत


मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई करण्यात आल्यानंतर अल्पसंख्याक व कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचा जावई अडचणीत आला आहे. समीर खान यांना अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून (NCB) समन्स बजावण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे समीर खान हे पती आहेत.

ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना एनसीबीने वांद्रे येथून गांजासह अटक केली होती. करण सजनानी याच्याकडून यावेळी मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात असल्याची माहिती चौकशीत समोर आली. या प्रकरणी राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. एनसीबीकडून यानंतर सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.

करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाल्याचे तपासादरम्यान समोर आले. हा व्यवहार ड्रग्जसाठी झाल्याचा एनसीबीला संशय आहे. यासाठीच समीर खान यांना समन्स बजावण्यात आले असून चौकशी केली जाणार आहे.