सत्कार करण्यासाठी आलेले कार्यकर्ते आणि प्रवक्त्यावंर अजित पवार भडकले!


पुणे: आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शीघ्र कोपी स्वभावाचे दर्शन झाले. सत्कार करण्यासाठी आलेल्या या कार्यकर्त्यांवर आणि प्रवक्त्यावंर अजित पवार भडकले. अरे कामे करू की सत्कार स्वीकारत फिरू?, अशा शब्दांत अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सुनावल्यामुळे मोठ्या उत्साहाने आलेल्या या कार्यकर्त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारने नुकताच गुंठेवारीचा निर्णय घेतला. अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने अजित पवार यांचा सत्कार करण्यासाठी 10 ते 12 गावचे ग्रामस्थ आले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ कोणतीही पूर्व सूचना न देता अचानक आल्याने अजित पवारांचा पारा चढला. काही पूर्व नियोजीत बैठका आणि कार्यक्रम ठरलेले असल्याने गावकऱ्यांच्या सत्कार समारंभात वेळ गेल्यास पुढचे संपूर्ण शेड्यूल बिघडणार असल्याचे लक्षात आल्याने अजित पवारांनी त्यांच्या प्रवक्त्याला बोलावले आणि थेट झापायला सुरूवात केली. एवढ्या मोठ्या प्रमाणवर गावकरी, कार्यकर्ते आले. आज सत्कार स्वीकारला तर रोजच सत्कार स्वीकारावा लागेल. मी काम करू की सत्कार स्वीकारू? असा सवाल अजित पवारांनी केला. काही गावकरीही यावेळी तिथेही असल्यामुळे अजित पवारांचा सत्कार करण्याचा सर्वांचा अपेक्षाभंग झाला.

अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महापालिका निवडणुका येत आहेत. या निवडणुकांमध्ये घड्याळ चालवा. आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर भर द्या. त्यासाठी पक्षबांधणी करा. आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन अजित पवारांनी केले. दरम्यान, एकीकडे पालिका निवडणुका एकत्रित लढण्यावर अजित पवार भर देत आहेत. दुसरीकडे निवडणुकीत कार्यकर्त्यांना घड्याळ चालवण्याचे आवाहनही करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.