पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली जाईल, असे जाहीर केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय हा प्रस्ताव आणून घेतला गेल्याचे केजरीवाल यांनी जाहीर करून गोमंतकीयांना सुखद धक्का दिला आहे.
केजरीवाल दिल्लीत स्थापन करणार कोंकणी अकादमी
विविध प्रकारे आपले काम गोवा जिंकण्याची इच्छा ठेवलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात सुरूच ठेवले आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पक्षाने एक जागा जिंकली. बाणावलीत जिंकलेल्या उमेदवाराला फोन करून केजरीवाल यांनी स्वत: त्या विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले होते.
केजरीवाल यांनी दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेऊन गोमंतकीयांना आश्चर्याचा पण सुखद धक्का दिला, असे राजकीय गोटात मानले जात आहे. गोव्याची कोंकणी ही राज्यभाषा आहे व राज्यभर सगळीकडेच कोंकणी बोलली जाते. कोंकणी भाषेला घटनेच्या आठव्या परिशिष्टातही स्थान आहे. मराठी ही राजभाषा कायद्यात सहभाषा आहे.
आमचे कोंकणीला प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे व त्यामुळे दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन करू, असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. आपण कोंकणी बोलणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो व कोंकणीवर जे प्रेम करतात त्या सर्वांचे देखील अभिनंदन करतो, असे केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गोव्यात आम आदमी पक्षाला केजरीवाल यांची ही नवी चाल मदतरुप ठरेल काय, याविषयी भाजप व विरोधी काँग्रेस पक्षातही चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस पक्ष गोव्यात सत्तेवर असतानाच कोंकणी भाषा १९८७ साली राज्यभाषा झाली. त्यावेळी कोंकणीसाठी मोठे आंदोलन झाले होते. पण केंद्रात व गोव्यात अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने कधी दिल्लीत कोंकणी अकादमी स्थापन केली नाही. कोंकणी अकादमी गोव्यात आहे. अनेक वर्षे सत्तेत राहून देखील भाजपनेही कधी गोव्याबाहेर कोंकणी अकादमी स्थापन करण्याचा विचार केला नव्हता.