अमेरिका एच-1बी व्हिसा प्रक्रियेत करणार बदल


वॉशिंग्टन – अमेरिकेने गुरूवारी एच-1बी व्हिसा प्रक्रियेच्या निवड प्रक्रियेत बदल करणार असल्याची घोषणा केली. सद्यस्थितीत सुरू असलेल्या लॉटरी सिस्टम ऐवजी वेतन आणि कौशल्याला यामध्ये प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील अंतिम नियम आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

यामागे अमेरिकेतील कामगारांच्या आर्थिक हितांचे रक्षण करणे हा उद्देश आहे. तसेच परदेशी कामगारांना तात्पुरत्या रोजगार कार्यक्रमाद्वारे उच्च कार्यक्षमतेचा फायदा होईल हेदेखील सुनिश्चित करणे यामागील उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एच-1बी व्हिसा हा अशाप्रकारचा व्हिसा आहे, जो अमेरिकन कंपन्यांना परदेशी कर्मचार्‍यांना विशिष्ट पदांवर ठेवण्याची परवानगी देतो.

दरवर्षी हजारो भारतीय आणि चिनी कर्मचाऱ्यांची अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या या व्हिसाच्या आधारे नियुक्ती करतात. उच्च वेतन आणि उच्च पदांवर अर्ज करण्यास एच-1बी व्हिसाच्या नियमांमधील बदलांमुळे प्रोत्साहन मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच आपल्या आवश्यकतेनुसार कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे आणि स्वत:ला जागतिक पातळीवर स्पर्धक म्हणून कायम ठेवण्याचा मार्गही मोठा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित झाल्यानंतर यासंदर्भातील अंतिम नियम हे ६० दिवसांमध्ये लागू होणार आहेत. १ एप्रिलपासून एच-1बी व्हिसासाठी अर्ज करण्याचा पुढील टप्पा सुरू करण्यात येणार आहे. एच-1बी व्हिसा योजनेचा काही कंपन्या गैरवापर करत आहेत. ते प्रामुख्याने सुरूवाची पदे भरणे आणि आपला खर्च कमी करण्यासाठी याचा वापर करत असल्याची माहिती USCIS चे उपसंचालक (धोरणे) जोसेफ एडलो यांनी दिली.