राज्याच्या पशूसंवर्धन विभागातील सुमारे ३ हजार जागा भरणार


मुंबई – गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे अनेक जणांना आपल्या नोकऱ्या गमवावे लागल्या आहेत. दरम्यान, सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती निघणार असल्याने सुवर्णसंधी चालून आली आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे तीन हजार पदांसाठी मेगा भरती निघणार आहे. पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही यामध्ये भरल्या जाणार असल्याची माहिती सुनील केदार यांनी दिली आहे. आगामी काही दिवसांत या भरती प्रक्रियेची माहिती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेल्या आहेत. पण आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे.