6 राज्यातील गरीब जनतेला स्वस्त, भूकंपविरोधी आणि मजबूत घरे देणार मोदी सरकार


नवी दिल्ली – वर्ष 2022पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून लाईट हाऊस प्रोजेक्टचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींचा नव्या वर्षातील हा पहिलाच कार्यक्रम होता.

शहरी भागातील लोकांना घरे देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा ठरेल. केंद्र आणि राज्य सरकारे या प्रोजेक्टअंतर्गत एकत्रितपणे, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड आणि तामिळनाडूतील गरीब जनतेला स्वस्त, भूकंपविरोधी आणि मजबूत घरे देतील.

मोदी यावेळी संबोधित करताना म्हणाले, मध्यम वर्गासाठी घरे तयार करण्यासाठी आज देशाला एक नवे तंत्र मिळत आहे. देशाला गृह निर्माणाचा हे 6 लाईट हाऊस प्रोजेक्ट मार्ग दाखवतील. ही लाईट हाऊस घरे आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केली जातील. ही घरे अधिक मजबूत आणि गरिबांसाठी सुविधाजनक तसेच आरामदायकही असतील. तसेच, हे एक को-ऑपरेटिव्ह फेडरलिझमचे उदाहरण असल्याचेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील 6 शहरांमध्ये 365 दिवसांत 1 हजार घरे लाईट हाऊस प्रोजेक्टअंतर्गत बांधली जातील. मोदी म्हणाले, याचा अर्थ रोजच्या रोज अडीच ते तीन घरे बांधून तयार होती. इंजिनिअर्स, विद्यार्थी आणि प्रोफेसर्स यांना यावेळी मोदींनी आवाहन केले, की या घरांच्या साईटवर त्यांनीही जावे आणि या प्रोजेक्टचे अध्ययन करावे. मोदी पुढे म्हणाले, या घरांसाठी विदेशी तंत्रज्ञानाचा आपण वापर करत आहोत. आपण याचे अध्ययन करावे, तसेच हे भारतासाठी योग्य आहे का, की यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हे पाहावे.

ज्या राज्यांची निवड लाईट हाऊस प्रोजेक्टसाठी करण्यात आली आहे. त्यांत त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाची लाईट हाऊस प्रोजेक्ट ही महत्वाकांक्षी योजना आहे. लोकांना याअंतर्गत स्थानिक हवामानाचा आणि पर्यावरणाचा विचार करून टिकाऊ घरे दिली जातील. एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त आणि मजबूत घरे या प्रोजेक्टमध्ये तयार केली जातात. यात कंपन्यांतूनच बीम-कॉलम आणि पॅनल तयार करून आणले जातात आणि घरांसाठी वापरले जातात. यामुळे घर बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचतो. विशेष म्हणजे या प्रोजेक्टअंतर्गत तयार झालेली घरे पूर्णपणे भूकंपविरोधी असतील.