फिटनेसविषयी या गैरसमजुती करा मनातून दूर


फिट राहण्यासाठी काय खावे, किती खावे, कोणता व्यायाम करावा, तो किती वेळासाठी करावा, विश्रांती कधी आणि किती वेळ घ्यावी, या सर्वच गोष्टींच्या बाबतीत अनेकांकडून अनेक सल्ले आपल्या कानावर सतत पडत असतात. पण या सल्ल्यांचा स्वीकार करून आपले फिटनेस रुटीन बनविण्याअगोदर फिटनेसविषयी आपल्या मनातून काही गैरसमज दूर करणेही आवश्यक आहे.

जिममध्ये व्यायाम करीत असताना अनेक व्यक्ती आपल्या रुटीनची सुरुवात ट्रेडमिलवर धावून करताना दिसतात. सर्वात आधी कार्डियो वर्कआउट करण्याकडे यांचा कल असतो. पण यामुळे शरीरातील ग्लायकोजेनची पातळी कमी होऊन, त्यानंतर वेट ट्रेनिंग करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे आपल्या रुटीनची सुरुवात ‘वेट ट्रेनिंग’ , म्हणजेच वजने उचालण्याने करावी. यामुळे शरीरातील कोर्टीसोन आणि टेस्टोस्टेरोनची पातळी वाढून याचा फायदा आपल्या वर्कआउट मध्ये होतो.

अनेकांच्या मते सकाळी सकाळी केलेला व्यायाम हा शरीरासाठी उत्तम असतो अशी एक समजूत असते. पण या मध्ये फारसे तथ्य नाही. व्यायाम दिवसातून कोणत्या वेळेला केला जावा यापेक्षा तो नियमित, दररोज केला जावा याला अधिक महत्व आहे असे तज्ञ म्हणतात. त्यामुळे व्यायाम सकाळी करायचा असो वा संध्याकाळी, शरीरासाठी तो तितकाच फायदेशीर ठरतो.

व्यायाम सुरु करण्यापूर्वी शरीराला हलक्या ‘वॉर्म अप’ची आवश्यकता असते. अश्या वेळी हृदयाच्या ठोक्यांची गती हलकीशी वाढेल असे व्यायामप्रकार वॉर्म अप म्हणून करणे योग्य असते. अनेक जण वॉर्म अप सोबत अनेक ‘स्ट्रेचिंग’चे व्यायामही करीत असतात. पण या वेळी ‘स्ट्रेचिंग’ मात्र फार करणे योग्य नाही. कारण व्यायाम करण्यापूर्वी जास्त प्रमाणामध्ये स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंवर ताण येऊन, त्यांना इजा पोहोचण्याची शक्यता तीस टक्क्यांनी वाढते. स्ट्रेचिंगचे व्यायामप्रकार मुख्यतः आपल्या व्यायामाच्या रुटीनच्या शेवटी, आपल्या शरीरातील स्नायू शिथिल करण्याकरिता केले जावेत.

त्याचप्रमाणे जितका जास्त घाम गळेल, तितके वजन झपाट्याने कमी होईल असा आणखी एक गैरसमज सर्रास पाहायला मिळतो. याच गैरसमजापायी अनेक जण केवळ कार्डियो व्यायाम करूनच घाम गाळीत असताना पाहायला मिळतात. मात्र वजन घटविण्यासाठी कार्डियो आणि वेट ट्रेनिंग हे दोन्ही प्रकार आवश्यक आहेत. वेट ट्रेनिंगमुळे शरीरातील स्नायूंचे टोनिंग होऊन त्यांना बळकटी मिळते, तसेच यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यासही मदत मिळते. तसेच व्यायाम केल्यावर शरीरामध्ये वेदना जितकी जास्त होईल, तितके चांगले अश्याही प्रकारचा गैरसमज काहींच्या मनामध्ये असतो. सवय नसताना एकदम व्यायाम सुरु केल्याने स्नायूंमध्ये थोडीफार वेदना उद्भविणे सामान्य असले, तरी ही वेदना प्रमाणाबाहेर वाढणे, व्यायाम चुकीच्या पद्धतीने करीत असल्याचे, किंवा स्नायूंना इजा झाल्याचे सूचक असू शकते. त्यामुळे ही वेदना जास्त काळाकरिता त्रस्त करीत राहिली, तर त्यासाठी त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment