पेट्रोल पंपांवरील मोफत सुविधांची माहिती ग्राहकांना असणे गरजेचे


एखादा पेट्रोल पंप हा कुठल्याही प्रकारच्या आपातकालीन प्रसंगाच्या वेळी आपल्या उपयोगी कश्याप्रकारे पडू शकतो याची माहिती अनेकांना नसते, कारण पेट्रोल पंपावर केवळ पेट्रोल भरण्यासाठी आपण जात असतो, आणि गाडीमध्ये पेट्रोल भरून झाले, की तिथून त्वरित बाहेर पडत असतो. पण कोणत्याही पेट्रोल पंपावर काही सुविधा ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध असतात, याची माहिती ग्राहकांना नसते. या सुविध कोणत्या आहेत हे जाणून घेऊ या.

अनेकदा पेट्रोलमध्ये भेसळ असल्याची शंका, किंवा गाडीमध्ये पेट्रोल/डीझेल भरीत असताना ते भरण्यामध्ये काही तरी घोटाळा होत असल्याची शंका अनेकदा ग्राहकांना येत असते. अश्या वेळी पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर द्वारे इंधनाची चाचणी करण्याचा हक्क ग्राहकाला आहे. अशी चाचणी केली जाण्याची मागणी संबंधित पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडे ग्राहक करू शकतात. तसेच या चाचणीसाठी कोणत्याही प्रकारचे दर आकारले जात नाहीत.

अनेकदा रस्त्यांवर अनेक लहान मोठे अपघात घडत असतात. अश्या वेळी आसपास पेट्रोल पंप असेल तर प्रथमोपचारासाठी आवश्यक सामग्री तिथून मिळू शकते. किंबहुना अपघात प्रसंगी आवश्यक त्या प्रथामोपाचारांसाठी लागणाऱ्या सर्व सामग्रीचा पुरेसा साठा असणे, आणि तो गरजूंना मोफत उपलब्ध करवून देणे, पट्रोल पंपांसाठी बंधनकारक आहे. त्यामुळे पुढील मदत येईपर्यंत किमान प्रथमोपचार केले जाणे शक्य होऊ शकते. त्याचप्रमाणे आपातकालीन परीस्थितीमध्ये इमर्जन्सी फोन करावयाचे असल्यासही, ही सुविधा ग्राहकांना मोफत उपलब्ध करून देणे पेट्रोल पंपांसाठी बंधनकारक असते. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या परीजानांना आपल्या जवळील फोनवरून संपर्क साधणे शक्य नसल्यास, जवळच्या पेट्रोल पंपावरून इमर्जन्सी कॉलच्या सुविधेचा वापर, नागरिक मोफत करू शकतात.

पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहाची सुविधाही पेट्रोल पंपांवर मोफत उपलब्ध असते. तसेच या सुविधांचा वापर करण्याकरिता त्या पेट्रोल पंपावरूनच गाडीमध्ये इंधन भरविणे गरजेचे नाही. प्रत्येक पेट्रोल पंपावर गाडीच्या चाकांमध्ये हवा भरण्याची सुविधा देखील मोफत उपलब्ध असते. त्यामुळे गाडीच्या चाकांमध्ये हवा भरण्यासाठी कोणताही दर आकारला जात नाही. गाडीमध्ये हवा भरण्यासाठी अगदी कमी दर जरी आकारला जात असला, तरी या विरोधामध्ये नागरिक, ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल करू शकतात.

Leave a Comment