सोन्यापेक्षाही महागडी ‘यारसागुम्बा’ बुरशी


तिब्बती भाषेमध्ये ‘यारसागुम्बा’ या शब्दाचा अर्थ ‘उन्हाळ्यातील गवत, थंडीतील किडा’ असा आहे. ही बुरशी म्हणजे एक अळी आणि बुरशीचे मिलन म्हणावे लागेल. एक परजीवी बुरशी, अळीवर हल्ला करून या अळीला मातीमध्ये दाबून तिचे रुपांतर चक्क एका ‘ममी’मध्ये करते. त्यानंतर या मृत अळीच्या शिरातून बुरशी निर्माण होते, हिलाच ‘यारसागुम्बा’ म्हटले जाते. ही बुरशी हिमालयीन प्रांतामध्ये आणि तिब्बती पठारावर ३०००-५००० मीटरच्या उंचीवर सापडते.

या बुरशीचे अनेक वैद्यकीय उपयोग असून, हिची किंमत सोन्याहूनही अधिक आहे. अनेक तज्ञांच्या मते या बुरशीचा वापर दमा, कर्करोग, आणि इतरही अनेक आजार बरे करण्यासाठी करता येऊ शकतो. या बुरशीला ‘हिमालयन व्हायाग्रा’ या नावाने देखील ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या बुरशीच्या एका किलो ची किंमत लाखो डॉलर्स पेक्षाही अधिक आहे. दर वर्षी मे आणि जून महिन्यांच्या दरम्यान, ह्या बुरशीच्या शोधार्थ हजारो नेपाळी लोक डोंगरांकडे आपला मोर्चा वळवितात.

यारसागुम्बाच्या शोधात हे नेपाळी लोक सकाळच्या वेळामध्ये डोंगरांवर ४५०० मीटरची चढाई करून जातात. अनेक वेळी हवामान खराब असते, पाऊस बरसत असतो, तर अनेक वेळा तुफान बर्फवृष्टी देखील होत असते. यारसागुम्बाच्या शोधामध्ये निघालेले हे लोक तशाही हवामानामध्ये तीन हजार मीटर उंचीवर आपले तळ ठोकतात. गोरखा, धाधिंग, लामजुंग यांसारख्या जमातींचे लोक दूरवरून या बुरशीच्या शोधार्थ येथे येत असतात. सुरुवातीला या लोकांना ही बुरशी ओळखू येत नसे. पण त्यानंतर या लोकांनी या बुरशीचे देठ कसे दिसते हे समजल्यानंतर आता मात्र ही बुरशी शोधण्यास त्यांना अडचण येत नाही. दररोज प्रत्येकी किमान दहा ते बारा यारसागुम्बा या लोकांना मिळतातच.

एका यारसागुम्बाची किंमत साधरण ४.५ डॉलर्स इतकी असते. पण चीन, अमेरिका, ब्रिटन, जपान, थायलंड आणि मलेशिया या देशांमध्ये ही किंमत पन्नास डॉलर्स प्रती यारसागुम्बा इतकी आहे. २०१४ साली यारसागुम्बाचा व्यापार करणाऱ्या नेपाळच्या अर्थव्यवस्थेला ५१ लाख रुपयांची कमाई झाली होती. तसेच अनेक देशांमध्ये या बुरशीची तस्करी सुरु असून, पुष्कळ जास्त किंमतीला या बुरशीची विक्री होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment