‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेक ‘अंतिम’चा टीझर रिलीज


नुकताच ‘राधेः योर मोस्ट वांटेड भाई’ या चित्रपटाचे भाईजान सलमान खानने चित्रीकरण पूर्ण केले असून यंदा हा चित्रपट रिलीज होणार होता, पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. सलमानने आता चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण केले असून चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम जोरात सुरू आहे. सलमानने त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या चित्रीकरणास सुरूवात केली. मराठीमधील हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

अभिनेता आयुष शर्मा देखील सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला आहे. सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने टीझरची सुरुवात होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात आयुषचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.

सलमान खान ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे, तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. १६ नोव्हेंबरपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. त्यावेळी फक्त आयुष शुटिंग करत होता. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट २०२१मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.