ब्रिटनव्यतिरिक्त ‘या’ देशांमध्ये सापडले कोरोनाच्या नवीन प्रकाराचे रुग्ण


नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झालेली असतानाच कोरोनाचा एक नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आला आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या आधीच्या प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. या नव्या प्रकाराची लागण होण्याची शक्यता अधिक असून हा नवीन प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे ब्रिटनने म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारापासून ७० टक्के संक्रमण होण्याचा जास्त धोका असल्यामुळे अनेक देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच दरम्यान नाताळ आणि नववर्षाच्या सुट्टया सुरु होत असताना, आता जगासमोर हे एक नवीन संकट उभे ठाकले आहे. याचदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी, सरकार सर्तक असून चिंता करण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.

तत्पूर्वी सौदी अरेबिया, कॅनडा या देशांनी देखील आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनमध्ये जाणाऱ्या आपल्या विमानसेवा नेदरलँड आणि बेल्जिअमने तात्पुरत्या स्थगित केल्या आहेत. विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याच्या विचारात इटलीदेखील आहे.

वेगाने फैलावणाऱ्या कोरोनाच्या या प्रकाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी लंडनमध्ये काही महिन्यांसाठी पुन्हा लॉकडाउन करावे लागू शकते, असे ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी म्हटले आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा ३० डिसेंबरला आढावा घेण्यात येईल.

कोरोनाच्या या नव्या प्रकाराचे अस्तित्व ब्रिटनच नाही तर दक्षिण आफ्रिकेतही आढळून आले आहे. या नव्या प्रकाराच्या कोरोनाची लंडनमधील ६० टक्के लोकांना बाधा झाली आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराचा रुग्ण नेदरलँडमध्ये सापडला आहे. ब्रिटनहून नुकत्याच परतलेल्या इटलीतील एका नागरिकाच्या शरीरातही हा स्ट्रेन सापडला आहे.

फक्त आंतरराष्ट्रीय विमान सेवाच सौदी अरेबियाने स्थगित केलेली नाही, तर जमीन, बंदरमार्गे देखील प्रवेशबंदी केली आहे. ब्रिटन ते नेदरलँड प्रवासी विमान सेवा एक जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. ब्रिटन, डेन्मार्क आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या परदेशी प्रवाशांना इस्रायलने प्रवेशबंदी केली आहे.