अनुप सोनीच्या जागी ही लोकप्रिय अभिनेत्री करणार ‘क्राइम पेट्रोल’चे सूत्रसंचालन


अपराध जगतावर आधारित छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणून क्राइम पेट्रोल हा ओळखला जातो. हा कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येतो. त्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय कार्यक्रमांच्या पंक्तीत जाऊन पोहचला आहे. विशेष म्हणजे अभिनेता अनुप सोनी या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला होता. त्यामुळे क्राइम पेट्रोलचा अनुप सोनी हा जणू एक चेहरा झाला होता. पण यापुढे आता या कार्यक्रमात अनुप सोनी दिसणार नसून त्याच्या जागी एक अभिनेत्री सूत्रसंचालन करताना दिसणार आहे.


“सावधान रहिए, सतर्क रहिए..”हा अनुप सोनी याचा संवाद सगळ्यांना तोंड पाठ झाला होता. पण या डायलॉगऐवजी आता ‘न सहमेंगी, न डरेंगी, न रुकेंगी, जाग जाग नारी तू, एक औरत पर वार अब हर औरत का भार’ या नवीन घोषवाक्यासह हा नवा डायलॉग प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. अनुप सोनीऐवजी आता अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ‘क्राइम पेट्रोल’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. सोनी टीव्हीने काही दिवसांपूर्वी क्राइम पेट्रोलचा एक प्रोमो शेअर केला होता. यामध्ये क्राइम पेट्रोलचा नवा चेहरा म्हणून दिव्यांका प्रेक्षकांसमोर आपली. या प्रोमोला “#WomenAgainstCrime दिव्यांका त्रिपाठीसोबत” असे कॅप्शन देण्यात देण्यात आले आहे. दिव्यांका २१ डिसेंबरपासून क्राइम पेट्रोलच्या नव्या भागात दिसून येणार आहे. ती स्त्रियांना या नव्या भागात जागरुक राहण्याचा संदेश देणार आहे.